Type Here to Get Search Results !

मतविक्रय नव्हे मतदान ; एक राष्ट्रकार्य प्रासंगिक - लोकजागर ✍️



 दिशा लाईव्ह न्यूज। -:-- जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील आपण सजग आणि सुजान नागरिक आहोत . निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सवच .या उत्सवात आपण मतदान करून आपला प्रतिनिधी , आपले सरकार निवडतो . खरंतर मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्यच आहे . परंतु अलीकडे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात  'अर्थ 'पूर्ण  घटना - घडामोडी घडताना दिसतात . अनेक ठिकाणी गुन्हे नोंद झाल्याच्याही बातम्या आपल्या वाचतो . स्वार्थी आणि सत्तांध राजकारणी सत्ताप्राप्तीसाठी मतांचा बाजार मांडतांना दिसताय . यावर अंकूश ठेवणे हे आपले सर्वांचे देशाचे नागरीक म्हणून कर्तव्य आहे .

      मतदानाप्रती मतदारांमध्ये जागरूकता यावी , यासाठी माननीय भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात . 'स्वीप ' हा त्यातलाच एक प्रभावी आणि परिणामकारक उपक्रम .  अर्थातच 

'Systematic Voters’ Education and Electoral Participation ' या आधारे मतदारांच्या मनांत लोकशाही मूल्य रुजवण्याचे कार्य केले जाते . 'मतदार राजा जागा हो । लोकशाहीचा धागा हो ' असे आवाहन करून मतदार राजाला आपल्या कर्तव्याप्रति जागृत केले जाते . शाळा - महाविद्यालयातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकशाहीचा जागर मांडला जातो . 

    प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या संविधानाने कलम ३२६ अन्वये मतदानाचा घटनात्मक अधिकार प्रदान केलेला आहे . मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे . देश घडविण्यात आपल्या एकेका मताची किंमत अमुल्य आहे . परंतु असे जरी असले तरी निवडणुका लागल्या की महसूल आणि गृह विभागाला जिल्हा व राज्य सीमांवर नाकाबंदी करून गाड्यांची तपासणी का करावी लागते ? त्यामागे कारण आहे पैशांची होणारी तस्करी .कारण हाच पैसा मतदारांपर्यंत पोहोचविला जात असावा . मतदान करणे म्हणजे मत विक्री करणे नव्हे . आपण स्वाभिमानाने मतदान केले पाहिजे . कुठल्याच प्रलोभनाला , अमिषाला बळी न पडता आपण आपला लोकप्रतिनिधी निवडला पाहिजे . लोकशाही बळकट करण्यात सामान्य मतदार हाच कणा आहे . तोच जर आपले मत विक्रीस काढत असेल तर नक्कीच लोकशाहीच्या हत्येसाठी हा मोठा सामाजिक गुन्हा ठरणार नाही काय ?   हा प्रश्न आपणास सजग नागरिक म्हणून अंतर्मुख व्हायला लावतो . 

   आपण सहज विचार करतो ,  की माझ्या एका मताने काय होणार ? चला घेऊ या पैसे आणि करूया मतदान .  पैसे घेतल्याशिवाय मतदान करणार नाही अशीही भूमिका घेणारे काही मतदार आपण उघडपणे पाहतो . खरंतर एका मताची किंमत काय असते ? इसवी सन १७७६ मध्ये अमेरिकेत  फक्त एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी  इंग्रजी भाषा राष्ट्रभाषा बनली . १९२३ मध्ये केवळ १ मत जास्त मिळाल्यामुळे  हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख बनला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली . अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारला १९९८ मध्ये केवळ एका मताने  पायउतार व्हावे लागले होते . एका मताचे मोल अमूल्य आहे . त्याची किंमत पैशांमध्ये करणे निश्चितच उचित नाही . खऱ्या अर्थाने आपल्याला लोकशाही बळकट करायची असेल ,  राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आपण निर्भीड ,  निःस्पृह ,   निस्वार्थीपणाने राष्ट्रहितासाठी मतदान केले पाहिजे . हातातील सर्व कामे सोडून मतदान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे . चला तर मग येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत  आपण आपल्या मतदानाचा हक्क बजाऊया आणि राष्ट्रनिर्माणाच्या पवित्र कार्यात सहभागी होऊया  .



शंकर रंगनाथ भामेरे ,

उपशिक्षक ,

सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालय ,  पहूर , ता . जामनेर

मो . नं . ९८ ९० ३१ ५० १२

Post a Comment

0 Comments