दिशा लाईव्ह न्यूज ,शंकर भामेरे-पहूर , ता . जामनेर ( ता . १ ) जामनेर तालुक्यातील पहुर कसबे येथे सप्टेंबर महिन्यातील रेशनच्या धान्यापासून ५० टक्के लाभार्थी वंचित असून गोरगरीब नागरिकांना ऐन सणासुदीच्या काळात त्रास सहन करावा लागत आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , सप्टेंबर महिन्यातील रेशनचे धान्य २८ सप्टेंबर रोजी स्थानिक दुकानदारांना प्राप्त झाले . त्यानंतर दोन दिवसात जवळपास ५०% नागरिकांना धान्य वाटप करण्यात आले . मात्र पुढील महिन्यात सदर धान्यवाटप बंद झाल्याने ५०% लाभार्थी वंचित राहिले आहेत .
संबंधित दुकानदारांना लाभार्थी धान्य मागणी करत आहेत .मात्र दुकानदार सदर धान्य वाटपाची परवानगी नसल्याने वाटू शकत नाहीत . त्यामुळे रेशन दुकानात धान्य पडून असताना देखील आपल्याला मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे .
या संदर्भात अरविंद देशमुख यांनी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून सप्टेंबर महिन्यातील धान्य वितरणास मुदतवाढ मिळण्याची मागणी केली आहे .
"आम्ही गोरगरीब नागरिक सप्टेंबर महिन्याच्या धान्यापासून वंचित आहोत . आम्हाला धान्य मिळालेच पाहिजे . गरिबांना धान्यापासून वंचित ठेवणे योग्य नाही . "
सुशीला पुंडलिक क्षीरसागर
रेशन कार्डधारक लाभार्थी .
" दोन दिवसात आम्ही ५०% लाभार्थ्यांना धान्य वाटप केले आहे . वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी निवेदन दिले असून परवानगी मिळताच आम्ही धान्य वाटप करू . "
गणेश भडांगे
रेशन दुकानदार
Post a Comment
0 Comments