Type Here to Get Search Results !

गरज 'तमसो मा ज्योतिर्गमय ' ची




लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघणाऱ्या दीपोत्सवाचा सण साजरा करताना आपल्या मनात नवनिर्माणची प्रेरणा  प्रज्वलित होते . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी . काळाच्या ओघात सण - उत्सवांचे बदलते स्वरूप पाहता खरोखरच आपण प्रकाशाकडे जातोय  का ? हा प्रश्न आपणास अंतर्मुख व्हायला लावतो .

        'दिवाळ सण मोठा

 नाही आनंदाला तोटा '  असे महात्म्य दिवाळीचे . सणांचा सण म्हणजे दिवाळी . अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश आपणास दीपोत्सवातून मिळतो . अन्याय -अत्याचार रूपी घनघोर अंधाराच्या साम्राज्यावर एक इवलीशी तेवणारी पणतीदेखील विजय प्राप्त करू शकते . एक प्रज्वलित पणती असंख्य पणत्या   पेटवू शकते , ते सामर्थ्य त्या पणतीत असते . 

             बदलत्या काळात सणाला 'सेलिब्रेशन्स ' चे रूप प्राप्त होत आहे .  आत्मनिर्भरतेचे स्वप्न आपण पाहत आहोत .राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची 'खेड्याकडे चला 'ही संकल्पना सुचवली खरी , परंतु आज गाव - खेड्यात  माती पासून कुंभार दादांनी तयार केलेल्या पणत्यांना  प्रथम पसंती न देता  विद्युत पणत्यांच्या रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळतो .  गावात बनविलेली 'केरसुणी ' दिवाळीत साक्षात लक्ष्मीचेच रूप धारण करते . परंतू एरवी गावा -गावातील  केरसुनी बनविणारे हात उपेक्षित होताना दिसतात . ग्रामीण संस्कृतीतील अर्थचक्र दिवाळी  भोवती फिरायचे .

         पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानिकारक ठरणारे फटाके , पक्षी -मुक्या जीवांसाठी घातक  ठरू पाहत आहेत . समाजातील उपेक्षित , रंजल्या -गांजल्यांकडे आपण किती संवेदनशीलतेने पाहतो ? त्यांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो ? व्यसनाधीनता , भ्रष्टाचार , लाचखोरी , कमिशनखोरी , महिला मुलींवर होणारे बलात्कार ,  शाळकरी विद्यार्थ्यांवर होणारी दुष्कृत्ये , सायबर गुन्हेगारी या आणि अशा अनेक सामाजिक समस्यांकडे डोळसपणे पाहिल्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला गरज वाटते ती 'तमसो मा ज्योतिर्गमय ' कडे जाण्याची . 



प्रासंगिक

✍️

शंकर रंगनाथ भामेरे 

उपशिक्षक ,

सावित्रीमाई फुले माध्यमिक विद्यालय , पहूर , ता . जामनेर .

मो . नं .९८ ९० ३१ ५० १२

Post a Comment

0 Comments