दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . २० )
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील विसदेवळी जवळ सोनदनदीवर बांधलेल्या पुलावरून पाय घसरून नदीत पडल्याने ७ वर्षीय चिमुकल्याचा करूण अंत झाल्याची हृदय द्रावक घटना रविवारी ( ता . २० ) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली .
यशवंत कडूबा कोळी असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे .
सविस्तर वृत्त असे की, शेंदुर्णी येथील कोळीवाडा भागातील विसदेवळी मंदीराजवळ मोराड रस्त्याकडे जाण्यासाठी सोन नदीवर लहान मोरी बांधण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अजिंठा डोंगररांगेत आणि परीसरामध्ये जोरदार पाऊस होत असल्याने नद्या - नालेही दूथडी भरून वाहत आहेत . मोरी मधील पाईपामध्ये घाण अडकल्याने पाणी मोरीच्या वरतून पाणी वाहत होते. ७ वर्षीय यशवंत दुपारच्या सुमारास मोरीवरून जात असतांना अंदाज न आल्याने पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहुन गेला. हे प्रत्यक्षदर्शींनी बघितले असता त्याचा तात्काळ शोध सुरू केला. परंतु, नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने चिमुकला यशवंत ५०० मिटर अंतरावर शनिमंदीरा समोरील नदीपात्रापर्यंत वाहत गेला. तसेच ,या भागातील पात्र खोल असल्याने शोध घेतांना अडचणी आल्या. अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नाने शनिमंदीरासमोरील पात्रात सापडला असता नाका तोंडातून पाणी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपचारार्थ तात्काळ दाखल करण्यात आले .तपासणी अंती वैद्यकीय अधिकारी डॉ .संदीप पाटील यांनी त्यास मृत घोषित केले.
डॉ .संदीप पाटील यांच्या खबरीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे . पुढील तपास पहूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शेंदुर्णी दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करीत आहे .
दरम्यान या दुर्दैवी घटनेने शेंदुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
Post a Comment
0 Comments