दिशा लाईव्ह न्युज
शंकर भामेरे ,पहूर , ता .जामनेर ( ता . १९)
'नभातल्या वरुणा ,
येऊ दे करुणा ।
कंसावरच अंकुरला ,
मक्याचा दाणा ।
या काव्यपंक्तींमधून व्यक्त होणारी बळीराजाची करूण कहाणी डोळ्यात पाणी आणणारी आहे .
परतीच्या पावसाने शेतकरी बांधवांवर वक्रदृष्टी फिरवल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे . ऐन दिवाळीच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे दिवाळं निघात असल्याचे चित्र दिसून येत आहे .
ग्रामीण भागात अत्यंत चिंताजनक परिस्थिती असून शेतकरी बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे . पेरणीपूर्व मशागतीपासून मोठ्या आशेने शेतकरी बांधवांनी महागडी बिजवाई आणून पेरणी केली खरी , मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले आहे . बियाणे , खते , फवारणीचे औषधे , मजुरी या सर्वांची गोळा बेरीज केली तर हाती भोपळाच आल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करत आहेत .
पांढरे सोने अति पावसाने काळवंडले असून मका पिकाची तर दयनीय अवस्था झाली आहे . पाच हजार ते साडेसहा हजार रुपये दराने शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत असून मक्याला कवडीमोल भाव मिळत आहे .शेतकऱ्यांनी जीवापाड जपलेली पिकं डोळ्यादेखत उध्वस्त होताना पाहून हृदय हेलावून जात आहे .
Post a Comment
0 Comments