दिशा लाईव्ह न्यूज -:- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वाघुर नदीच्या तीरावर वसलेलं पहूर कसबे हे कृषीप्रधान गावं माझी कर्मभूमी .आयुष्यभर समाजसेवेचा वसा व्रतस्तपणे जोपासणाऱ्या स्वर्गीय तुकाराम धोंडू पवार यांच्या संस्कारक्षम कुटुंबात माझा जन्म झाला . शेतीनिष्ठ शेतकरी राहिलेले स्वर्गीय तुकाराम धोंडू पवार संत्री , पेरू , उस , केळी या फळबागा आणि बारमाही भाजीपाला आणि कपाशीचे मुख्य उत्पन्न घेऊन त्यांनी उपजिवीका करत .
तत्कालीन सावकारी पाशातून शेतकरी बांधवांना मुक्त करण्यासाठी माझे आजोबा स्वर्गीय तुकाराम धोंडू पवार यांनी पहूर कसबे विविध कार्यकारी सोसायटीची मुहूर्तमेढ रोवली . अनेक वर्ष संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले . शेतकरी बांधवांच्या हितासाठी पीक संरक्षण संस्थेची स्थापना करून सामाजिक सेवेचा वसा आयुष्यभर जपला . पीक संरक्षण संस्थेचे ते संस्थापक होते .माझे आजोबा स्वर्गीय तुकाराम धोंडू पवार एक कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व होते .त्यांना तीन पत्नी , अकरा मुलं तर चार मुली असे जवळपास ७५ जणांचं त्यांचं एकत्रित कुटुंब .
आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी एकत्र कुटुंबात सर्व कुटुंबीयांचा आभाळ मायेनं सांभाळ केला .प्रगतिशील मिरची उत्पादक शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळख असणारे माझे वडील स्वभावाने अतिशय तिखट , मात्र त्यांच्या ठाई असणारा गोडवा म्हणजे माणुसकीचा अथांग सागरच. स्वर्गीय भास्कर तुकाराम पवार हे माझे वडील . १९९४ मध्ये स्थापन झालेल्या जय सप्तशृंगी माँ पतसंस्थेचे ते मुख्य प्रवर्तक म्हणजेच संस्थापक होते . सन २००२ पर्यंत त्यांनी पतसंस्थेचे चेअरमन पद भूषविले .महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि संचालक म्हणून त्यांनी कार्य केले . १९८२ - ८३ मध्ये झालेल्या जिल्हास्तरीय फळ प्रदर्शनात त्यांना संत्री ,पेरू आणि टोमॅटो या तिघही फळांच्या उत्कृष्ट उत्पादनासाठी जिल्ह्यातून सर्वप्रथम क्रमांक प्राप्त झाला . माझे आई - वडील आणि गुरुजन हे खऱ्या अर्थाने माझे आदर्श आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने शेती अन् मातीशी जुळलेली नाळ आजतागायत तशीच कायम आहे .
पहूर - कसबे जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं . शेताच्या बांधावर काम करत करत मी आर . टी . लेले हायस्कूल मधून माध्यमिक , तर कला वाणिज्य महाविद्यालय जामनेर येथून पदवी शिक्षण पूर्ण केले . इंग्रजीची आवड असल्याने मी या विषयात बी .ए .पदवी प्राप्त केली .त्यानंतर उल्हासनगर येथे नॅशनल कॉलेज ऑफ एज्युकेशन मधून बी .एड . ची पदवी मिळाविली . पुढे १९९२ - ९३ मध्ये एक वर्ष मी जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब . गो.शानभाग विद्यालय , सावखेडा बुद्रुक या शाळेत अध्यापनाचे कार्य केले .
त्यानंतर पुढच्याच वर्षी १९९३ मध्ये पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात मी शिक्षक पदी रुजू झालो .संकटं ही प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येतच असतात . त्या संकटांच्या छाताडावर पाय रोवून उभं राहण्याचं सामर्थ्य माझ्या वडिलांकडून मला प्राप्त झाले . आपल्या ध्येयनिष्ठेतून आपल्याला अडथळ्यांवर मात करता येते याची अनुभूती मला प्रत्यक्ष घेता आली . ३१ वर्षे निरंतर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत मी आज मी माझ्या शाळेत याच वर्षी पर्यवेक्षक पदी विराजमान झालो आहे . विद्यार्थी हेच माझे दैवत असून त्यांच्यासाठी मी कधी काळ - वेळेचे गणित जुळवलेच नाही . अगदी शाळेत रुजू झाल्यापासून आज पर्यंत सातत्याने ३१ वर्षे अखंडपणे उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे कुठलाही मोबदला न घेता जादा क्लास घेऊन विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजी भाषेविषयी गोडी निर्माण केली . केवळ सामाजिक भावनेतून आणि विद्यार्थ्यांप्रतीच्या अति प्रेमातून शिक्षक म्हणून केलेले हे कार्य मला निरंतर ऊर्जा देत राहते . यंदा सप्टेंबर २०२४ मध्ये नियतवयोमानानुसार मी ज्ञानदानाच्या कार्यातून सेवानिवृत्त होणार आहे .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर मला देशभक्तीचे संस्कार मिळाले . आपली माणसं आणि आपण जपलेली माणुसकी हिच आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान संपत्ती असते.आपल्या माणसांना उद्योग -व्यवसायात पुढे नेण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लागावा या ध्येयाने प्रेरित होऊन माझ्या धर्मपत्नी सौ . मंगला मधूकर पवार यांनी २९ डिसेंबर २००३ रोजी भारत माता महिला पतसंस्थेची मुहूर्तमेढ रोवली .सर्व सहकारी भगिनींना सोबत घेऊन आज तागायत असंख्य महिला - भगिनींना पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक विकास साधण्यासाठी मदतीचा हात दिलेला आहे .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून निस्वार्थपणे राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केल्याबद्दल २०१० मध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते सन्मानित होण्याचा बहूमान मिळाला .त्यांच्यासोबत घालविलेले सुवर्णक्षण मला सदैव प्रेरणा देत राहतात . संघ प्रणित 'सहकार भारती 'च्या माध्यमातून जिल्हा ग्रामीण संघटक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे .दैनिक तरुण भारतच्या माध्यमातून मी समाजातील अन्यायाला वाचा फोडली .साप्ताहिक विवेक प्रमाणेच सांस्कृतिक वार्तापत्र घराघरात पोहोचावे या ध्येयाने प्रेरित होऊन जिल्हाभर प्रतिनिधी म्हणून कार्य केले .
पुत्रो हम पृथव्या '
या भूमीचे पुत्र
म्हणून आत्मभान
कर्तव्याची जाण
आणि वर्तमानाचे आव्हान ! आपण समर्थपणे पेललेच पाहिजे .
सन २००५ - ०६ मध्ये महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या माध्यमातून डॉ . हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सुरू केले . महात्मा फुले शिक्षण संस्थेचा संस्थापक सदस्य आणि पुढे कार्यकारी सचिव म्हणून २०१२ - १३ पर्यंत यशस्वीरित्या कार्यभार सांभाळत शाळेला आणि संस्थेला ऊर्जेतावस्था प्राप्त करून देण्यासाठी तन - मन - धन अर्पण केले . सन २०१२ - १३ पर्यंत माळी समाज पंच म्हणून मी केलेले कार्य माझ्यासाठी अविस्मरणीय आहे .
शिक्षण क्षेत्रासोबतच सहकार , समाजसेवा , धर्मकारण हे प्रांतही माझे आवडीचेच राहिले आहेत .क्षत्रिय माळी समाज संघटना पहूर , महात्मा फुले शिक्षण संस्था पहूर , भारत माता महिला पतसंस्था पहूर आदी संस्थांच्या माध्यमातून वेळोवेळी सत्कार्य करण्याची संधी मिळाली , म्हणजे त्या संधीचं सोनं केल्याखेरीज मला स्वस्थ वाटत नाही . समाजात होणारा अन्याय दूर करण्यासाठीही माझा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे .आजोबा आणि वडिलांकडून मिळालेला एकत्रित कुटुंबाचा वसा आणि वारसा आजही जपण्यात मला अभिमान वाटतो . गावातील आणि पंचक्रोशीतील सांस्कृतिक चळवळीत अग्रभागी राहून कार्य करण्याची तळमळ मला आजही तितकीच प्रेरणा देते .भारत माता पतसंस्थेतर्फे प्रतिवर्षी स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी बस स्थानक परिसरात होणारे 'भारत माता पूजन 'गावाच्या सांस्कृतिक चळवळीचा एक अविभाज्य भाग बनला आहे .विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयाप्रती आढळनिष्ठा राखून ध्येयप्राप्तीसाठी प्रयत्न करायला हवेत . नियत वयोमानानुसार मी शासकीय सेवेतून ३० सप्टेंबर रोजी ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झालो . आज ४ रोजी शाळेने माझ्या सेवापूर्ती सोहळ्याबद्दल आयोजित केलेल्या सुवर्णक्षणाबद्दल मला मनस्वी आनंद होत आहे .
जय हिंद !
वन्दे मातरम् । 🙏
आपलाच ,✍️
मधुकर भास्कर पवार ,
पर्यवेक्षक ,
आर .टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , पहूर , ता . जामनेर , जि . जळगांव .
मो . नं . ९४२१५२३४१६
Post a Comment
0 Comments