Type Here to Get Search Results !

प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पहूरच्या श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरास राज्य शासनाचा ' ब 'वर्ग दर्जा ! 'काशीखंड ' ग्रंथात उल्लेख : शिवभक्तांमध्ये चैतन्य !

 


दिशा लाईव्ह न्यूज

 शंकर भामेरे  पहूर , ता . जामनेर ( ता . ९) प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि 'काशीखंड 'ग्रंथात उल्लेख असलेल्या पहूर पेठ येथील वाघुर नदीच्या तीरावर वसलेल्या निसर्गरम्य श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिरास राज्य शासनाचा ' ब 'वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे .

        ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत परिसरातील शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री . क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिराला ' ब 'वर्ग दर्जा तीर्थक्षेत्र म्हणून गौरविण्यात आल्याने पहूर  परिसरात शिवभक्तांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे . 


                       मंत्री महाजनांची शिवपूजा

राज्याचे पर्यटन व ग्रामविकास मंत्री ना . गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष समाधान कडूबा पाटील यांच्यासह सर्व विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी मंदिराला ' ब 'वर्गाचा सन्मान प्राप्त झाला आहे . 

 

                       काय आहे इतिहास ?

श्री क्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या कुशीत उगम पावलेल्या वाघुर नदीच्या तीरावर वसलेले आहे .

त्रेतायुगात  प्रभू श्री रामचंद्र दंडकारण्यात वनवासाला जात असताना  या ठिकाणी शिवलिंगाची पूजा केल्याची आख्यायिका सांगितली जाते . वाघूर आणि केवडी नाल्याच्या संगमावर  उघड्यावर असलेल्या 

 स्वयंभू शिवलिंग मंदिराची उभारणी करण्यासाठी सन१९८८ मध्ये शिवभक्त रंगनाथ महाराज यांच्या पुढाकाराने पहूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश आठवले यांच्यासह भाविकांनी भरीव योगदान देऊन चार खांबांचे मंदिर उभारले होते .  

 स्व . बी . एस . पाटील यांनी उभारलेल्या शिवपार्वती मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी

शिवभक्त रंगनाथ महाराज यांनी  २ फेब्रुवारी १९९२ ते १५ मार्च १९९२ असे   ४२ दिवसांचे मौनव्रत अनुष्ठान केले होते . 

स्थानिक गुरव कुटुंबीय परंपरागत पुजारी म्हणून सेवा वाहत आहेत .


                    धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

येथे विवाह सोहळे , नवस , किर्तन सप्ताह , भजन पूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम होतात . श्रावण महिन्यात दर सोमवारी भाविकांची मोठी गर्दी असते . शिवरात्रीला भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येतात . 

 आज श्रीक्षेत्र केवडेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सहकार्याने मंदिर परिसराचा विकास होत असून  लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत आहे .

Post a Comment

0 Comments