Type Here to Get Search Results !

पहूरचा पूल परिसर बनला अनधिकृत वाहनतळ वाहतुकीची कोंडी फोडण्याचे पोलिसांसमोर आव्हान ! प्रशासन अपघाताची वाट पाहत आहे काय ? नागरिकांचा संताप सवाल !



दिशा लाईव्ह न्यूज, शंकर भामेरे,  पहूर , ता  . जामनेर ( ता . २८ ) जळगाव - छत्रपती संभाजी नगर राष्ट्रीय महामार्ग ७५३ एफ वरील पहूर जवळील वाघुर नदी पूल परिसर अनधिकृत वाहनतळ बनला असून पोलिसांसमोर वाहतुकीची कोंडी फोडण्याचे आव्हान उभे टाकले आहे . प्रशासन मोठ्या अपघाताची वाट  पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांसह वाहन चालक करत आहेत.


सध्या सणासुदीचे दिवस असल्याने वाहनांची प्रचंड गर्दी मुख्य महामार्गावर होताना दिसून येत आहे . रविवारच्या आठवडे बाजाराच्या दिवशी तर चक्क पुलावरच काही नागरिकांनी आपली वाहने पार्क केल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक खोळंबली होती . 

वाघुर नदीवर उभारण्यात आलेल्या दोन्ही फुलांच्या आजूबाजूचा परिसर दुचाकी वाहनांनी व्यापून गेल्याने महामार्गावरून येणारी जाणारी वाहने तारेवरची कसरत करत मार्ग काढत आहेत . वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे . पहुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले होते .मात्र संबंधित ठिकाणी  पोलीस बंदोबस्त लावण्यात येऊनही या रविवारीही मोठ्या प्रमाणात वाहने लागल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती . 



वाघुर नदीचा पूल परिसर यापूर्वीही धोक्याचा बनला आहे .

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नाकर्तेपणामुळे प्रतिभावंत बालकवयित्री ज्ञानेश्वरी शंकर भामेरे हिचा गेल्या वर्षी अपघाती मृत्यू झाला होता .तसेच परप्रांतीय नागरिका बरोबरच एका हात मजुराचा ही बळी याच ठिकाणी केलेला आहे . ही सगळी वस्तुस्थिती असताना पोलीस प्रशासनासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर संबंधित अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असून सामान्य माणसाच्या जीवाची किंमत कोणालाच नाही असा सवाल केला जात आहे .

 शहर पत्रकार संघटनेने पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनानंतर नवीन महामार्ग पूल सुरू झाला असला तरी उर्वरित कामे मात्र अजूनही बाकी आहेत . पादचारी फुल सुरू न झाल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे . शाळकरी विद्यार्थी , नागरिक महिला मोठ्या संख्येने या पूल परिसरातून ये जा करत असतात त्यामुळे पादचारी फुल सुरू होणे अत्यंत आवश्यक आहे . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

मागील आठवड्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रखडलेले काम पूर्ण करण्यासाठी बॅरिकेट लावून काम सुरू केले .मात्र दोनच दिवसात सदर बॅरिकेट काढून केवळ मलमपट्टी करत पुन्हा वाहतूक सुरू केल्याने  अपूर्ण अवस्थेतील काम सुरू असल्याचा बनाव का करण्यात आला असा प्रश्नही नागरिकांमधून विचारला जात आहे .

Post a Comment

0 Comments