शांताराम चौधरी, सर--पाचोरा दि. 18 - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली नवनियुक्त 24 सदस्यीय मंडळावर पाचोरा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य व इतिहासाचे साक्षेपी संशोधक डॉ. भी. ना. पाटील यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या वतीने दि. 16/10/2024 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. डॉ. भी. ना. पाटील यांची नियुक्ती पुढील 03 वर्षासाठी राहील. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासून चालत आलेल्या मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या परंपरेत श्री. मे. पु. रेगे, श्री. रा. ग. जाधव, प्रा डॉ. राजा दीक्षित या विद्वान संशोधक आणि अभ्यासकांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची ही उज्वल परंपरा चालू राहिली.
प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील यांची विश्वकोश निर्मिती मंडळावरील नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सचिव व मराठी भाषा विकास संस्थेचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे यांनी अभिनंदन केले. तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मा. भाऊसाहेब दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासाहेब संजय वाघ, मानद सचिव मा. ॲड. दादासाहेब महेश देशमुख, व्हा. चेअरमन मा. नानासाहेब व्ही. टी. जोशी, संचालक, विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, कार्यालयीन अधिकारी, संस्थेचे हितचिंतक व मित्र परिवार विशेषत: संस्थेच्या पाचोरा आणि भडगाव महाविद्यालय परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. बांबरुड (राणीचे) येथील डॉ. राममनोहर लोहिया विद्यालयात संस्थेच्या वतीने आयोजित लोकनेते स्व. अप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांच्या 12 व्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित श्रद्धांजली मेळाव्यात प्राचार्य डॉ. भी. ना. पाटील यांचा मा. भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या शुभहस्ते संस्था आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने हृद्य सत्कार करण्यात आला.
Post a Comment
0 Comments