शंकर भामेरे,पहूर , ता . जामनेर ( ता . १३ )
शेंदुर्णी मार्गावर पहूर जवळ जीवघेणे खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थट्टा होत आहे .
ग्रामीण रुग्णालयापासून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत २ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले असून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे . दुभाजकाचे कामही अपूर्ण आहे . खरंतर चौपदरीकरणात संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे . मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ जिथे खड्डे आहे तिथेच डांबरीकरण करून खड्डे बुजवत थट्टा केली जात आहे . जीवघेण्या खड्ड्यांमधील डांबरीकरण करण्यासाठी देखील अत्यंत विलंब लागत असल्याने पहूर पोलीस ठाणे , आर . टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात खड्डे चुकवताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल त्रस्त वाहनचालकांसह नागरिक करीत आहेत .
सूचना फलकांचा विसर ?
चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे . खरंतर हा रस्ता अतिशय वर्दळीचा आहे . या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावणे अत्यंत निकडीचे झाली आहे .
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मार्गावर ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत , स्वयंचलित सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी , रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण करावे , रस्त्याच्या दुतर्फा असणारी नाली पूर्ण करून स्थानिक रहिवाशांसह नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी जोर धरत आहे .
Post a Comment
0 Comments