दिशा लाईव्ह न्यूज-शंकर भामेरे, पहूर , ता . जामनेर ( ता . १० ) ऐतिहासिक आणि प्राचीन परंपरा लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मायबोलीचा सन्मान वाढला आहे , असे गौरवोद्गार कवी तथा उदयोन्मुख लेखक ,तसेच दिशा लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी शंकर रंगनाथ भामेरे यांनी काढले . ते पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष ग्रामसभेत बोलत होते .
काल बुधवारी ( ता . १० ) पहूर कसबे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले . केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एकमुखी ठराव ग्रामसभेत पारित करण्यात आला.
माजी सरपंच शंकर जाधव अध्यक्षस्थानी होते . प्रारंभी सुप्रसिद्ध उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे आधारवड स्वर्गीय रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
याप्रसंगी ग्रामविकास अधिकारी अशोक बाविस्कर यांनी केंद्र सरकारच्या अभिनंदनचा ठराव मांडला . या ठरावाला सर्वानुमते संमती देण्यात आली . गावाचा वाढता विस्तार पाहता आपल्या गावात वैकुंठ रथ सुविधा मिळणे आवश्यक आहे .शव विच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घरापर्यंत नेतांना नातेवाईकांचे अत्यंत हाल होतात . या पार्श्वभूमीवर शववाहिका सुविधा मिळणे गरजेचे आहे .
पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापासून स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय स्थिती झाली आहे . या रस्त्याची त्वरित दुरुस्ती व्हावी . गावात भरदिवसा सुरू असणारे विजेचे दिवे वेळोवेळी बंद करून विजेचा होणारा अपपव्य टाळावा . ग्रामपंचायत कार्यालयात माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दर्शनी भागात फलक लावण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईश्वर भगवान हिवाळे यांनी केली . तसेच पहूर आणि परिसरात होणाऱ्या वाढत्या चोऱ्या थांबवण्यासाठी , पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंदे बंद व्हावेत व पोलीस अधिकारी यांची बदली करण्यात यावी ,अशी मागणी ग्रामस्थांनी केली .
याप्रसंगी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष अर्जुन लहासे , माजी सरपंच लक्ष्मण गोरे , उपसरपंच राजू जाधव , ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे , शिवाजी राऊत , विश्वनाथ घोंगडे , दिनकर पवार , पुंडलिक लहासे , बाळू सुरळकर ,सुभाष धनगर , मधुकर बनकर , भानुदास जाधव , पुंडलिक भडांगे , किरण जाधव शरीफुद्दीन शेख , चेतन रोकडे , सुनील लहासे , ईश्वर बनकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
Post a Comment
0 Comments