Type Here to Get Search Results !

ऐ नर्गिस-ए-मस्ताना-हर रंग क़यामत है.. हर ढंग शरारत है दिल तोड़ के चल देना.. ये हुस्न की आदत है.. कारवी---सौन्दर्याची मस्तानी-


दिशा लाईव्ह न्यूज-----आज पुन्हा भटकंतीचा मूळ मार्ग विसरून कारवीच्या दुनियेत हरवून गेलो. गेल्या दोन महिन्यांपासून कारवीच्या गर्द जांभळ्या रंगाने सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अनेक रान मुक्त रंगवली आहेत. 



कारवी खरे तर सौंदर्याची मस्तानी आहे. हिरवी पाने, गुलाबी बोंडे, कधी फिकट तर कधी गर्द गुलाबी पाकळ्यांचा साज असलेली कारवी वेड लावून सोडते. मात्र, डोंगरधारेत मोहित करीत अनेकदा ती गायब होते. म्हणून तिच्याबाबत म्हणता येईल...

हर रंग क़यामत है.. हर ढंग शरारत है

दिल तोड़ के चल देना.. ये हुस्न की आदत है..

कारवीने वनस्पती शास्त्रज्ञांना १९४०-५० च्या दशकापासून मोहिनी घातलेली आहे. तीन ते आठ वर्षाच्या दरम्यान फुलणारी कारवी अनेकदा तिचा कालावधी सोडूनही फुलते. म्हणजे ती काहीशी मनमौजी आहे.  मुंबईच्या सेंट झेवियर महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे प्राध्यापक हर्मेंगिल्ड सेंतापाऊ यांनी १९४० च्या दशकात कारवीवर संशोधन केले होते. 


सह्याद्रीत मराठी माणूस झोपडीत राहू लागला तोच मुळी कारवीच्या मदतीने. झोपड्यांसाठी कारवीच्या काड्या वापरण्याची पद्धत शेकडो वर्षे जुनी आहे.  तिच्या फुलण्याने मधुमक्षिकांची संख्यावृद्धी होण्यास मदत होते. मधुकणांची चलती वाढते. एकाअर्थी परागीभवनात कारवीचा वाटा मोठा आहे.


कारवीकडे पाहिल्याने डोळे सुखावतात. पहाटेच्या प्रसन्न आकाशातील शेकडो निळे तारे जमिनीवर पसरल्याचा भास कारवीकडे नजर टाकताच होतो. माझ्या भटकंतीच्या सर्वच वाटांमध्ये सध्या कारवीने तिच्या पुष्प पाकळ्यांचा सडा टाकलेला आहे.



सखे कारवी तू अशीच फुलत रहा. सह्याद्रीतील सर्वच भटक्यांचे तुझ्यावर अतोनात प्रेम आहे... आणि म्हणून...


छोटा सफ़र हो, लम्बा सफ़र हो, 

सूनी डगर हो या मेला

याद तू आए, मन हो जाए, भीड़ के बीच अकेला

हाँ, बादल बिजली, चंदन पानी जैसा अपना प्यार

लेना होगा जनम हमें, कई कई बार....



✍️मनोज कापडे 

 सह्याद्री पर्वतरांगा, पुणे.

९८८११३१०५९🕊️

Post a Comment

0 Comments