Type Here to Get Search Results !

बदरखे येथे यात्रेत तमाशा पाहण्यासाठी आलेल्या तरुणाचा खून -- पाचोरा तालुक्यात खळबळ.. गुन्हेगाराचा तपास लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान.

 


पाचोरा--  पाचोरा  तालुक्यातील बदरखे येथे  आलेल्या  पेमबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम पाहण्यासाठी  हनुमंतखेडे येथून आलेल्या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. 

मयत मनोज ज्ञानेश्वर निकम (वय – २६) असे मृत तरुणाचे नाव आहे.मृताच्या नातेवाईकांनी मनोजचा खून झाल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की,पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या बदरखे येथे सालाबादप्रमाणे पेमबुवा महाराजांची यात्रेनिमित्त तमाशाचा कार्यक्रम सुरु आहे. दरम्यान, तमाशा सुरू असलेल्या ठिकाणाहून काही अंतरावर २५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मनोज ज्ञानेश्वर निकम (२६, रा. हनुमंतखेडा ता. सोयगाव. जि. संभाजीनगर ) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मयत मनोज निकम याच्या शरीरावर काही ठिकाणी मार लागल्याचे आढळून आल्यामुळे सदरील मृतदेह पुढील चौकशीकामी जळगाव शासकीय रुग्णालय येथे पाठविण्यात आला. मात्र, मनोज निकम याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.त्यामुळे पाचोरा पोलिसांसमोर एक आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान,  मयत तरुण मनोज निकम याचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याचा खुन करण्यात आल्याचा आरोप त्याच्या  नातेवाईकांनी केला आहे.तसेच नातेवाईक हे  मारेकऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर ठाम होते. अखेर २६ डिसेंबर रोजी नंदकिशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात मारेकऱ्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल खताळ हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments