Type Here to Get Search Results !

गांवपातळीवरील मच्छीमार समाज आजही "ना घर का, ना ही घाटका ".... श्री अर्जुनभोई, मुंबई

 


महाराष्ट्र राज्यातील गांवपातळीवरून असणारा मच्छीमारी करणारा आमचा पारंपारिक मच्छीमार समुदाय हा ब-याच ठिकाणी आजही ना घर का, ना घाटका असाच दिसत आहे त्यातूनच धरण आहे उशाशी, घर घर आमच्या बापाची... अशी अवस्था महाराष्ट्रभर दिसत आहे. विशाल संख्येने महाराष्ट्र राज्यात असलेला आमचा मच्छीमार समाज जो भोई, ढिवर-धीवर, कहार, केवट, मल्लाव... अशा ३७ जमाती घटकांचा समुदाय असतांनाही आमच्यातील एकीच्या अभावाने आजही आमचा बाप, फाटलेली मच्छरदाणी ठिक ठिकाणी शिवत बसला आहे, तिचे जाळे करणार म्हणुन... आणि त्यात दोन चार मासं पकडण्यासाठी तिचा उपयोग होईल म्हणूनच तो विचार करतांना दिसत आहे. आमची माय अजुनही काही ठिकाणी रेशनच्या धान्यातील किडे काढत त्याचे दळण करत बसली आहे आपल्या मुलांच्या पोटाला तुकडा मिळावा म्हणून... आपली पोरं, फाटक्या चड्ड्या आणि उसलेली शर्ट घालून विविध नद्या नाल्यांवर, धरणांवर संख्यात्मक भटकत फिरत आहेत. घरची लक्ष्मी, दुस-याच्या घरी धुनी भांडी करायला, दुसऱ्यांच्या शेतात काम करण्यासाठी, बाप वेठबिगारी करण्यासाठी गेला आहे. एवढे होत असतांनाही आम्ही एकलपणाच्या भावात आमचे मोठेपण आणि दिलदारपणा मिरवण्यात व्यस्त आहोत तरी त्याचा काहीही उपयोग होतांना दिसत नाही. आमचाही आवाज राज्यातील विधान सभेत, विधान परिषदेत गाजावा म्हणून आमचा संपूर्ण समुदाय शिस्तबद्ध जागा असावा. झोपलेल्याचे आणि झोपेचं सोंग घेतलेल्यांचे तरी अस्तित्व हे नसतेच.... आमच्या समस्त मच्छीमार जनांच्या हक्कांसाठी, वैचारिक पातळीची अभेद्य तटबंदी उभी करून आमचे पारंपरिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्नरत राहणे ही काळाची अति आवश्यक बाब होऊन बसली आहे. दुस-यांना मोठं करण्यासाठी आमच्या समाजाला मातीत घालण्याचे षडयंत्र जर कोणी करत असेल तर निश्चित त्याचाही समाचार घेण्यासाठी आमच्या भोई, कहार, केवट, ढिवर-धीवर, मल्लाव... या ३७ जमाती घटकांची झुंड आणि तिची झुंज ही समोर येणं तरी आवश्यक.... बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांच्या समोर भोई, ढिवर-धीवर, कहार, केवट, मल्लाव... या ३७ भटक्या जमाती फक्त मतदान करणा-या, इतरांच्या पालख्या वाहणा-या... असे तरी होता कामा नये.

Post a Comment

0 Comments